हिंदू धर्म हा भारतीय उपखंडातील सर्वात मोठा महत्त्वाचा धर्म आणि जीवनपद्धती आहे. आजही सनातनी हिंदू माणसे स्वधर्माचा 'सनातन धर्म' असा उल्लेख करतात. हिंदू संस्कृती ही एक पुरातन संस्कृती आहे. तिचे मूळ सिंधू खोऱ्यामध्ये होते. हा धर्म मानणारी माणसे जगात 'हिंदू' या नावाने ओळखली जाऊ लागली. सिंधू नदीच्या खोऱ्यात राहणारे ते सिंधू आणि त्याचा अपभ्रंश हिंदू अशी प्रांतीय व्याख्या होते. भारतात राहणाऱ्या लोकांना प्रथम मोगल शासकांनी 'हिंदू' असे म्हणायला सुरुवात केली.
हिंदू धर्मीयांमध्ये असंख्य पंथ आहेत. त्यांपैकी शैव, वैष्णव, शाक्त, माध्व, गाणपत्य, वारकरी, लिंगायत, दत्त संप्रदाय, नाथपंथ, महानुभाव पंथ, गोसावी पंथ हे काही आहेत. अन्य धर्मांचा असतो तसा हिंदू धर्माचा संस्थापक नाही; तसेच मुख्य धर्मग्रंथही नाही. धर्माची काही तत्त्वे 'श्रीमद्भगवद्गीता' या ग्रंथात विशद केली गेली आहेत.
भारतीय संस्कृतीत एकत्रितपणे नांदणाऱ्या वैविध्यपूर्ण पंथांना, संप्रदायांना, समाजांना आणि जीवनपद्धतींना एकत्रितपणे 'हिंदू धर्म' असे संबोधले जाते. हजारो वर्षांच्या काळात या समाजाने एक संस्कृती, जीवनदृष्टी व त्यावर आधारीत एक जीवनपद्धती निर्माण केली. हिंदुत्व ही संकल्पना जीवनाकडे पाहण्याचा एक दृष्टीकोन आहे. निसर्गातील चर, अचर आणि अनेकविध श्रद्धा, संकल्पना व मूल्यांच्या पूजांची परंपरा हीसुद्धा या संस्कृतीची ठळक वैशिष्ट्ये आहेत. या संपूर्ण संस्कृतीस 'हिंदू धर्म' असे नाव मिळाले.
हिंदू धर्मातील देवता या हिंदू धर्म आणि परंपरेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य मानले जाते. हिंदू संस्कृतीने अनेक देवतावाद स्वीकारला असल्याने विविध स्त्री-पुरुष देवतांची उपासना या धर्मात केली जात असल्याचे दिसून येते. हिंदू धर्मातील अनेक पंथांच्या माध्यमातून शंकर, विष्णू, गणपती, देवी, सूर्य, अशा मुख्य देवता आणि त्यांच्या परिवारातील देवता तसेच त्यांच्या उपदेवतांची उपासना केली जाते.
हिंदू धर्मातील देवतांचा विकास वैदीक काळात झालेला आहे. वैदीक काळापासून पुराण काळापर्यंत बऱ्याच देवदेवता आपल्याला प्रचलित असलेल्या सापडतात. उदा:- वरुण, इंद्र, अश्विनीकुमार, ब्रह्मणस्पति, रुद्र, सोम अशा विविध देवता तसेच निसर्गातील आग, पाऊस, वारा, नदी अशा विविध शक्तींना देवतास्वरूप देऊन त्यांची प्रार्थना केली जाते. हिंदू धर्मामध्ये देवांची संख्या एकूण ३३ कोटी आहे. यामध्ये बऱ्याच देवतांची नावे आपल्याला परिचित नाहीत म्हणून काही प्रमुख देवांची नावे पुढीलप्रमाणे आहेत - गणपती ही देवता प्रथम पूजनीय आहे, तसेच शिव, पार्वती (महाकाली) रिद्धी-सिद्धी, कार्तिकेय, कौमारी, विष्णू, लक्ष्मी (महालक्ष्मी), ब्रह्मदेव, सरस्वती (महासरस्वती) इत्यादी व त्यांचे अनेक अवतार प्रसिद्ध आहेत. अशा देवी, देवता हिंदू धर्मात आहेत आणि असंख्य भक्त या देवतांची मनोभावे पूजा करताना आपल्याला दिसतात.
हिंदू सनातन धर्म हा व्यक्ती प्रवर्तित नसून याचा आधार वेदादिक धर्मग्रंथ हा आहे. याची संख्या खूप मोठी आहे. याचे दोन विभाग आहेत -
१) श्रुति:- हा ग्रंथ अपौरुषेय मानला जातो. यामध्ये चार वेदांमधील (ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद) संहिता, ब्राह्मण, आरण्यक, उपनिषद, वेदांग, सूत्र इत्यादी ग्रंथांची गणना केली जाते.
२) स्मृति:- हा ग्रंथ ऋषीप्रणीत मानला जातो. यामध्ये १८ स्मृति, १८ पुराणे तसेच रामायण व महाभारत हे दोन इतिहास ग्रंथ सुद्धा मानले जातात. त्याचप्रमाणे श्रीमद्भगवद्गीता आणि ब्रह्मसूत्र उपनिषद या दोन अतिशय महत्त्वाच्या ग्रंथांचा सुद्धा यामध्ये समावेश होतो.
कोणत्याही देवतेला श्रद्धायुक्त अंतःकरणाने विधियुक्त उपचार समर्पण करणे यालाच पूजा म्हणतात.
हिंदू धर्मामध्ये देवपूजेला अनन्यसाधारण महत्त्व असून त्याचे वैयक्तिक अनेक फायदे आहेत. देवपूजेदरम्यान करण्यात येणाऱ्या प्रत्येक क्रियेमागे एक शास्त्र असून त्यामुळे आपले शारिरीक, मानसिक आणि भावनिक आरोग्य चांगले राहते.