पंचायतन म्हणजे पाच देवांचा, पाच गुरुंचा, पाच थोर व्यक्तींचा किंवा पाच वस्तूंचा समुदाय आणि त्यांची पूजा. विभिन्न उपास्य देवांना मानत असलेल्या उपासकांमध्ये असलेले द्वेष कमी करण्यासाठी आद्य शंकराचार्य यांनी समाजात जाणीवपूर्वक पंचायतन पूजेची सुरुवात करून दिली. ह्या पद्धतीनुसार विष्णू पंचायतन, शिव पंचायतन, गणेश पंचायतन, सूर्य पंचायतन आणि देवी पंचायतन या काही प्रमुख देवतांचा यामध्ये समावेश करण्यात आला. या पाच देवतांमधून उपासक ज्या देवाला प्रधान मानत असेल त्याला मुख्य स्थान देऊन आजुबाजूला दुसरे चार देव ठेवून पूजा करायची अशी प्रथा सुरू झाली. पंचायतन पूजापद्धतीमुळे भाविकांच्या श्रध्दा जपल्या गेल्या आणि समाजात असलेल्या विभिन्न संप्रदायांमधील राग, द्वेषही कमी झाला. अशा पद्धतीने पंचायतन पूजा पद्धत समाजामधे रूढ झाली. आता आपण पंचायतनामध्ये सांगितलेल्या प्रमुख देवतांचा संक्षिप्त स्वरूपात आढावा घेऊ.