मानवाच्या जन्मवेळी असलेल्या आकाशस्थ ग्रह ताऱ्यांचा नकाशा एका विशिष्ट पद्धतीने मांडलेला असणे याला ‘कुंडली’ असे म्हणतात.
लग्न कुंडली- या कुंडलीला जन्म कुंडली असेही नाव आहे. सर्व आयुष्याचा फलादेश ज्या कुंडलीवरुन प्रामुख्याने जाणता येतो ती जन्म किंवा लग्न कुंडली होय.
चंद्र कुंडली - लग्न कुंडली एवढेच महत्त्व चंद्र कुंडलीला आहे. सर्व ग्रहांमध्ये सर्वात वेगवान गती चंद्र ग्रहाची असल्यामुळे त्याचा मनाशी संबंध जोडला गेला आहे. ग्रहांच्या बदलत्या स्थितीचा परिणाम विशेषतः चंद्र कुंडलीतून दिसून येतो तसेच विवाह किंवा उपनयनासाठी मुहूर्त लाभतो की नाही हे या कुंडलीवरून ठरते. चंद्र कुंडली वरून मासफल, वर्षफल, भविष्यकथनही केले जाते.
भावचलित कुंडली- जन्मपत्रिकेमध्ये कोणता ग्रह कोणत्या स्थानाचे फल देण्यास समर्थ आहे हे निश्चित ठरविण्यासाठी भावचलित कुंडलीचा विचार करावा लागतो. ही कुंडली मांडण्याची पद्धत खूप प्राचीन आहे. लग्न कुंडली वरून फलादेश सांगताना भावचलित कुंडलीचा बारकाईने विचार केला जातो.
प्रश्न कुंडली- जेव्हा जातकाची जन्म कुंडली उपलब्ध नसेल तसेच अती संकटकाळी वा अडचणीच्या प्रसंगी जातकाचा प्रश्न लवकर सोडवणे गरजेचे असेल तेव्हा प्रश्नकुंडलीची आवश्यकता भासते.
असे काही कुंडलीचे प्रकार आहेत व त्यावरून ज्योतिषी भविष्यकथन करतात

सर्वसाधारणपणे प्रत्येक ज्योतिषी कुंडली पाहून काही उपाय सांगतात. पापकर्माला खोडून काढण्यासाठी कोणती पुण्यशक्ती कर्मात दाखवली आहे ते ज्योतिषी अनुभव आणि ज्ञानाच्या आधारे सांगतात. त्यांनी सांगितलेल्या उपायानुसार जातकाने तसे कर्म केले तर त्याचे पापकर्म हळूहळू कमी होत जाते आणि त्याला शुभ फलाची प्राप्ती होते. पण हल्ली काही माणसे उत्सुकतेपोटी आपले भविष्य काय आहे ते जाणून घेण्याच्या उद्देशाने आपली पत्रिका दाखवतात व ज्योतिषाने सांगितलेले उपाय करत नाहीत किंवा चुकीच्या पद्धतीने उपाय करतात. उलट आपले काम झाले नाही म्हणून ज्योतिषाला नावे ठेवून त्याला बदनाम करतात. असे केल्याने त्यांना योग्य ते फळ मिळत नाहीच याउलट ज्योतिष विद्येचा अपमान केल्याचे वाईट फळच त्यांना मिळते.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्योतिषशास्त्रावर श्रद्धा आणि एकाच ज्योतिषावर विश्वास हवा. प्रत्येक ज्योतिषी फक्त योग्य मार्ग दाखवण्याचे काम करतात, बाकी फळ देणे हे परमेश्वराचे काम आहे.