हिंदू धर्मातील सोळा संस्कारांपैकी हा पंधरावा संस्कार आहे. ज्यामध्ये विवाहाची इच्छा असणारे उपवर स्त्री आणि पुरुष ब्राह्मण, नातलग, सगेसोयरे आणि अग्नि यांच्या साक्षीने पती - पत्नी म्हणून संबद्ध होतात. या संस्काराला ‘विवाह’ असे म्हणतात. या संस्कारात अग्नी भोवती सात प्रदक्षिणा घालून व ध्रुवताऱ्यास साक्षी ठेवून दोन शरीरे, मने आणि आत्मे एका पवित्र बंधनात बांधले जातात. या संस्काराला पाणिग्रहण, उपयम, परिणय, उद्वाह अशी काही नावे आहेत. विवाह ही केवळ कुटुंबातील महत्त्वाची घटना नसून तिचे समाजाच्या दृष्टीनेही महत्त्व आहे. धर्म संपत्ती आणि प्रजा संपत्ती असे विवाहाचे दोन उद्देश मानले जातात.
हिंदू समजुतीनुसार मानवी जीवनास ब्रम्हचर्याश्रम, गृहस्थाश्रम, संन्यासाश्रम, वानप्रस्थाश्रम या चार आश्रमात विभागले गेले आहे. त्यातील गृहस्थाश्रमासाठी पाणिग्रहण म्हणजेच विवाह संस्कार हा अत्यावश्यक आहे. म्हणुनच ‘धन्यो गृहस्थश्रम’ असे म्हटले जाते. चांगला गृहस्थ होण्यासाठी रितीरिवाजांपेक्षा शास्त्रात सांगितलेल्या गोष्टी कशा अंमलात आणता येतील याकडे सर्वांनी लक्ष द्यावे.