‘राहत्या घरी व देवतेच्या स्थानावर पूजा केल्याने होणारे फायदे’ भारतीय संस्कृतीत परंपरा, चालीरीती याला खूप महत्त्व असल्याचे दिसून येते. देशभरातील कोट्यवधी कुटुंबांमध्ये दररोज आपली इष्टदेवता, कुलदेव, कुलदेवता यांचे पूजन केले जाते, त्याचप्रमाणे दरवर्षी येणारे कुलाचार, व्रतवैकल्ये केली जातात. आपल्या घरातील पावित्र्य राखणारी मंगल जागा म्हणजे देवघर किंवा देव्हारा. दररोज सकाळी उठल्यावर शुचिर्भूत होऊन घरातील देवांची पूजा असंख्य लोक करतात. भगवंतांचे नामस्मरण, पूजन, स्तोत्र पठण हे अत्यंत शुभ मानले गेले आहे. तिन्हीसांजेच्या वेळी देवासमोर निरांजन, समई, उदबत्ती किंवा धूप लावून देवाचे नामस्मरण किंवा नित्य स्तोत्र पठण केल्यास मानसिक शांतता, प्रसन्नता लाभते. आपण घरात वावरताना,चालताना, बोलताना आपल्या हातून कळत-नकळत किडे, मुंगी, डास इत्यादी कीटक मारले जातात, तसेच घरी आलेली पाहुणे मंडळी वा घरातील माणसांना आपल्याकडून काही अपशब्द बोलले जातात किंवा त्यांचा आपल्याला काही ना काही त्रास होत असतो त्याचे रूपांतर वाद व भांडण यामध्ये होते. या सगळ्याचा थेट परिणाम आपल्यावर व आपल्या वास्तूवर होत असतो. अशा काही कारणांमुळे वास्तूला मालिन्य येते, ते दूर करण्यासाठी दरवर्षी आपल्या घरी ब्राह्मणद्वारा वेदपठण, मंत्रघोष, विविध प्रकारच्या पूजा, होम हवन किंवा तत्संबंधी मांगलिक कार्य करावे. असे केल्यामुळे घरी एक चांगले वातावरण तयार होते. घरातील मालिन्य नाहीसे होते. कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीमध्ये सात्विक भाव जागृत होतात. वास्तू प्रसन्न राहतो. वातावरणातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जा वाढते व रोगप्रतिकारक शक्ती वाढायला मदत होते.
काही ठराविक विधी असे आहेत की ते आपण राहत्या घरी करू शकत नाही. त्यांची एक विशिष्ट जागा ठरलेली असते. उदा:- त्रिपिंडी श्राद्ध, नारायण व नागबली आणि तत्संबंधी श्राद्धादीक कर्मे क्षेत्र स्थानी म्हणजेच जिकडे देवाचे स्वयंभू स्थान वा अस्तित्व असते तिकडे केले जाते. असे केल्याने आपल्या गतपितरांना पुढची गती प्राप्त होते किंवा ते मोक्ष पदाला जातात अशी आख्यायिका आहे.
आपल्याला कोणत्याही देवळात वा देवाच्या स्थानावर गेल्यानंतर एक वेगळ्याच प्रकारचा आनंद मिळतो, कारण त्या स्थानाचे महत्त्वच वेगळे असते. भरपूर प्रमाणात सकारात्मक ऊर्जेचा स्त्रोत त्याठिकाणी वाहात असतो. ह्या स्थानावर जाऊन आपण देवाचे नामस्मरण, ध्यान, जप किंवा ब्राह्मणद्वारा पूजा-अर्चा, धार्मिक विधी इत्यादी केल्यास साक्षात परमेश्वराची अनुभूती असल्याचा भास नक्कीच आपल्याला होतो. काही लोकांना त्याची प्रचिती येते.
आपले मानसिक समाधान तर होतेच आणि देवाच्या स्थानी आपण चांगले कर्म करून परमेश्वराचा भरभरून आशिर्वाद मिळाल्याचा एक सुखद अनुभव आपल्याला मिळतो.