गणपती ही पंचायतनामधील एक प्रमुख देवता आहे. हिंदू धर्मात सर्वात प्रथम महत्त्व या देवाला दिले जाते. बुध्दीचा व विद्येचा अधिष्ठाता, विघ्नांचा नियंत्रक असा हा देव आहे. गणेश पंचायतनामध्ये गणपती मध्यभागी व ईशान्य कोपऱ्यापासून अनुक्रमे विष्णु, शंकर, सूर्य आणि देवी अशा देवता मांडून त्यांची पूजा केली जाते.
कोणत्याही शुभ कार्याच्या आरंभी गणपतीचे स्मरण किंवा पूजन केले जाते. भारतात गणपतीची पूजा प्रचलित आहे. विशेषतः महाराष्ट्र राज्यात गणपतीची पूजा व उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे होतात. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग व कलियुग या चार युगांमध्ये गणपतीचे वेगवेगळे अवतार आहेत. गणेश पुराण व मुद्गल पुराणात गणपतीच्या अवतारकार्यांचे कथानक सांगितले आहे. गणपतीची अनेक मंदिरे या भूतलावर पसरलेली आहेत. त्यातील महाराष्ट्रातील अष्टविनायक मंदिरे प्रसिद्ध आहेत.
शिवशंकर आणि पार्वती देवी यांचा पुत्र म्हणून गणपती ही देवता ओळखली जाते. ही वैश्विक तसेच वैदिक देवता आहे. प्रत्येक कार्यात प्रेरणा देणारी देवता आहे. गणपतीचा प्रथम उल्लेख प्राचीनतम हिंदू धर्मग्रंथ असलेल्या ऋग्वेदामध्ये आढळतो. माघी गणेशोत्सव व भाद्रपद शुक्ल चतुर्थीला येणारी गणेश चतुर्थी हे दोन उत्सव महाराष्ट्राप्रमाणेच कर्नाटक, आंध्रप्रदेश व बंगालमध्ये अतिशय उत्साहात आणि धार्मिक पद्धतीने साजरे केले जातात. गणपतीसाठी उद्देशून करण्यात येणारी धार्मिक कार्ये खालील प्रमाणे आहेत.
गणपती पूजन, गणपती अथर्वशीर्ष जप व सहस्रावर्तन अभिषेक, संकष्टी व्रत पूजा, विनायक चतुर्थीपूजा, सत्यविनायक पूजा, गणेशयाग (गणहोम), गणेश चतुर्थीपूजा, माघी गणपती पूजा, पंचांगस्थ गणपती पूजन, विनायक शांत, दूर्वा गणपती व्रत पूजा.