मृत पितरांना उद्देशून आपले आवडते पदार्थ ब्राह्मणांना श्रद्धापूर्वक दिले जातात त्याला 'श्राद्ध' असे म्हणतात. श्राद्धाचेच दुसरे नाव ‘पितृयज्ञ’ असे आहे. आपले गतपितर किंवा जीवात्मे आपापल्या कर्मानुसार जन्म-मरणाच्या चक्रात अडकून राहतात त्यांच्या मुक्तीसाठी श्राद्ध करणे आवश्यक आहे. पितरांविषयी आदर बाळगणे, त्यांच्या नावे दानधर्म करणे व त्यांना संतोष होईल अशी कृत्ये करणे हे वंशजांचे कर्तव्य आहे असे धर्मशास्त्र सांगते. या मागील एक मान्यता आहे की ज्या पूर्वजांमुळे आपण आज अस्तित्वात आहोत, ज्यांच्याकडून आपल्याला गुण व कौशल्ये इत्यादी वारसा मिळाली आहेत त्यांचे आपण काही देणे लागतो त्या ऋणातून मुक्त होण्यासाठी श्राद्ध करावे.
श्राद्धविधी हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा विधी असून त्याला वेद काळाचा आधार आहे. अवतारांनीही श्राद्धविधी केल्याचा उल्लेख आढळतो. श्राद्धविधीची मूळ संकल्पना ब्रह्मदेवांचे पुत्र अत्रिऋषी यांची आहे. अत्रिऋषी यांनी त्यांच्या वंशातील निमी यांना ब्रह्मदेवांनी सांगितलेला श्राद्धविधी सांगितला. तो रूढ आचार आजही चालू आहे. लक्ष्मण आणि जानकी यांसह श्रीराम वनवासाला गेल्यानंतर भरत त्यांची वनवासात भेट घेतो तेव्हा राजा दशरथ यांच्या निधनाची बातमी सांगितल्यावर श्रीराम आपल्या वडिलांचे श्राद्ध करतात असा उल्लेख रामायणात आहे.
सांवत्सरीक श्राद्ध, नांदीश्राद्ध, महालय श्राद्ध, मासिक श्राद्ध, भरणी श्राद्ध, दर्श श्राद्ध, मातामह श्राद्ध, अविधवानवमी श्राद्ध, हिरण्य श्राद्ध, तीर्थ श्राद्ध, घृतश्राद्ध, दधिश्राद्ध, भीमाष्टमी श्राद्ध, यतेराराधनविधी (सन्याशांचे श्राद्ध) अक्षय्य तृतीया श्राद्ध.
असे काही श्राद्धांचे प्रकार प्रचलित असून प्रत्येकाने गतपितरांच्या मुक्तीसाठी आणि आपल्या कुळाचा उद्धार होण्यासाठी श्राद्ध करावे.