हिंदू धर्मात जे मुख्य सोळा संस्कार सांगितले आहेत त्यांपैकी उपनयन हा एक संस्कार आहे. परंपरेनुसार हा संस्कार ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या तीन वर्णातील लोकांनाच सांगितला आहे. याला मौंजीबंधन, व्रतबंध अशीही नावे आहेत. गृह्यसूत्रोक्त कर्माने बालकाला वेदाध्ययनासाठी गुरुजवळ नेले जाते त्याला ‘उपनयन’ म्हणतात. या संस्कारानंतर संस्कारित बटू आपल्या पालकांपासून दूर जाऊन स्वतःच्या शिक्षणावर लक्ष केंद्रीत करतो. या संस्कारात यज्ञोपवीत म्हणजेच जानवे धारण करणे हा मुख्य विधी आहे.
साधारणपणे हा संस्कार ब्राह्मणांमध्ये आठव्या वर्षी, क्षत्रियांमध्ये अकराव्या व वैश्य जातींमध्ये बाराव्या वर्षी केला जातो. सर्व सोळा संस्कारात उपनयन हा संस्कार सर्वात श्रेष्ठ समजला जातो. हा संस्कार केल्याने बटूला वेदाध्ययनाचा अधिकार प्राप्त होतो. तसेच या दृष्टीने गायत्री मंत्राच्या उपदेशाला अनन्यसाधारण महत्व देण्यात आले आहे. म्हणूनच बटूला वैदिक धर्मात सांगितलेली कर्मे करण्याचाही अधिकार प्राप्त होतो. या संस्काराला दुसरा जन्म मानण्याची चाल आहे. म्हणूनच उपनयन झालेल्या बटूला ‘द्विज’ असे म्हणतात.
या संस्काराला व्रतबंध असेही एक नाव आहे. व्रतबंध म्हणजेच नियमांची बद्धता. पर्यायाने बालकाला उपनयन झालेल्या दिवसापासून निरनिराळ्या व्रतांचा अवलंब करून संयमी व यशस्वी जीवनाचा पाया घातला जातो. मानवी जीवनातील ब्रह्मचर्य व्रताचे पालन कसे करावे हे उपनयन संस्काराद्वारे उत्तमपणे शिकवले जाते. चांगली शारिरीक तसेच मानसिक वाढ होण्यासाठी काही बंधने अत्यावश्यक असतात हीच बंधने विशिष्ट संस्काराच्या माध्यमातून मनावर अधिक प्रभावीपणे ठसतात. असा हा उपनयन संस्कार प्रत्येकाने आवर्जून करावा.